लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर):शिर्डी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेताच श्रीरामपुरात त्याविरुद्ध तीव्र पडसाद उमटले आहेत. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या श्रीरामपूरच्या दाव्याला त्यामुळे धक्का बसला आहे. आमदार लहू कानडे यांचे बंधू अशोक कानडे तसेच जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिर्डी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय करण्याबरोबरच तेथे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे त्याकरिता आग्रही होते. हा निर्णय जाहीर होताच श्रीरामपुरातून त्याला विरोध नोंदविण्यात आला असून रस्त्यावर उतरून लढाईचे संकेत नेत्यांनी दिले आहेत. त्याकरिता राजकीय गटतट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता जिल्हा विभाजनाची अनेक वर्षांपासून मागणी आहे. नवीन जिल्हा निर्मितीसाठी श्रीरामपूर शर्यतीत सर्वात पुढे आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, आरटीओ, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, प्रांताधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस, पासपोर्ट कार्यालय, मध्यवर्ती रेल्वे स्थानक आदी कारणांमुळे शहराची बाजू वरचढ ठरली आहे. शहराच्या बाजूला शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने विस्ताराला येथे वाव आहे. मात्र, शिर्डी येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्णयामुळे श्रीरामपूरकरांना धक्का बसला आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने श्रीरामपूरवर अन्याय केला आहे. जिल्हा निर्मितीसाठी सर्व पायाभूत सुविधा येथे उपलब्ध असताना सरकारने चुकीचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी याविरुद्ध लढा देण्याचे सूतोवाच केले आहे. राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही यात पुढे आले आहेत.