अहमदनगर: प्रभागातील विकासकामांसाठी नगरसेवकांना त्यांच्या हक्काचा निधीही मिळत नाही. महापालिकेला जर आम्हाला निधीच द्यायचा नसेल तर बजेटमध्ये तरतूदच कशाला करता? असा संतप्त सवाल करत जर नगरसेवकांना तातडीने निधी उपलब्ध झाला नाही तर पुढील स्थायी समितीच्या सभेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी दिला.
सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी महापालिकेत स्थायी समितीची सभा झाली. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, मुद्दसर शेख, प्रदीप परदेशी, गौरी नन्नवरे, पल्लवी जाधव, सुनीता कोतकर, कमल सप्रे आदी उपस्थित होते. बारस्कर म्हणाले प्रभागात अनेक छाेेटीमोठी विकासकामे करावी लागतात. नागरिक सकाळीच घरी येऊन कामे मार्गी लावण्याची मागणी करतात. बहुतांशीवेळा ठेकेदाराकडून आम्ही कामे करून घेतो. मात्र, त्या कामाचे बिल निघत नाही. आमच्या हक्काचा निधीही आम्हाला मिळत नसेल तर आम्ही प्रभागात कामे कशी करणार असे ते म्हणाले. या विषयावर सभापती कवडे यांनीही प्रशासनावर संताप व्यक्त केला. नगरसेवकांना त्यांचा निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी लेखाधिकारी शैलेश मोरे यांना दिले.