अहमदनगर : माजी मंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल रामकिसन राठोड (७०) यांचे बुधवारी पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा विक्रम, सून, नातवंडे असा परिवार आहे. राठोड यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोबाईल आमदार, शिवसेनेचा वाघ, अनिल भैय्या अशी बिरुदे राठोड यांना लोकांकडून मिळाली होती. १९९० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९५, १९९९, २००४ आणि २००९ अशा सलग पाच वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी १९९५ ते १९९७ या काळात त्यांना अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राठोड यांचे कुटुंब मुळचे राजस्थानमधील होते. वडिलांनी नगरमध्ये येऊन व्यवसाय केला. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांच्या व्यवसायात मदत केली.मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्तशिवसेना त्यांच्या रक्तात होती. त्यांचा प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठीच होता. हिंदुत्त्वाचा ते बुलंद आवाज होते. त्यांच्या जाण्याने एक विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.