शेवगाव (पद्मभूषण बाळासाहेब भारदे साहित्य नगरी) : भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित २७ व्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात सारेगमप लिटिल चॅम्प विजेत्या अंजली व नंदिनी गायकवाड या गायिका भगिनींनी सादर केलेल्या बहारदार गायन मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले.बालकुमार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दुपारी ३ वाजता ‘उगवते तारे’ या शीर्षकाखाली ही गायन मैफल झाली. ‘सूर निरागस हो’ या गीताने या मैफलीस प्रारंभ झाला.
अंजली व नंदिनी या भगिनींनी मन मंदिरा तेजाने, क्षणभर उघड नयन देवा, घागर घेऊन निघाली, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, बापू सेहत के लिये हानिकारक है, यार हो यारा, मैं बेनाम हो गया, हसता हुवा नुरानी चेहरा असे एकाहून एक सरस लोकप्रिय हिंदी चित्रपट गीत, गवळण, भावगीत व भक्तीगीत सादर केले.झी मराठी वरील सारेगमप कार्यक्रमाचा उपविजेता उभरता गायक योगेश रणमले याने आनंद पोटात माज्या मायेना, ही दुनिया मायाजाल ही गाणी सादर केली. तर अंगद गायकवाड यांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे भावगीत सादर केले. त्यांना तबल्यावर प्रशांत थोरात, किबोर्डवर अजित गवारे, गिटारवर अजित वधवा यांनी संगीत साथ केली. अंगद गायकवाड यांनी या मैफलीचे संगीत संयोजन केले. भक्ती शिंदे हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.अंजली व नंदिनी गायकवाड या भगिनींनी सादर केलेल्या सर्वच गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हसता हुवा नुरानी चेहरा या जुन्या लोकप्रिय चित्रपट गीतावर प्रेक्षकांनी ठेका धरला. सर्व कलावंतांचा भारदे साक्षरता मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.