राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी पत्र पाठवून अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे.
अण्णा हजारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत असे खोटे व बदनामीकारक वक्तव्य मलिक यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चा करताना केले होते. या वक्तव्याचा राळेगणसिद्धी परिवाराने तीव्र निषेध करून अण्णांच्या भेटीला निघालेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राळेगणसिद्धी येथे प्रवेश नाकारला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर येथे हजारे यांची माफी मागत, नवाब यांचे वक्तव्य ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते.
वक्तव्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी अशी नोटीस हजारे यांनी २ फेब्रुवारी रोजी मलिक यांना अॅड. मिलिंद पवार यांच्या मार्फत पाठवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. त्यावर मलिक यांनी लेखी माफी मागितली. 'माझा हेतू आपले मन दुखावण्याचा नव्हता. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना आपण देखील आपणास शाब्दिक वाद वाढवायचा नसल्याचे सांगितले आहे. माझ्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण वडीलधारी व्यक्ती असूनझालेल्या प्रकाराने आपले मन दुखावले असेल, तर मी देखील दिलगिरी व्यक्त करीत आहे' असे मलिक यांनी माफीनाम्यात म्हटले आहे.