पारनेर : दिल्लीच्या शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले.
दिल्लीमधील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलन स अण्णा हजारे यांनी पूर्वीच पाठिंबा दिला आहे. अण्णा हजारे म्हणाले, कृषीमूल्य आयोगाला सरकारनं स्वायत्तता द्यायला हवी, अशी मागणी आपली पूर्वीपासून आहे. असे सांगून अण्णा हजारे यांनी मंगळवारी सकाळी संत यादव बाबा मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले आणि पद्मावती मंदिरात जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले.
स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारनं गेल्या वेळेस मान्य केली. २३ मार्च २०१८ ला लिखित आश्वासन दिले. पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही.
मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो, पण आश्वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी ७ दिवस उपोषण केले. कृषिमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्वासन दिले की, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनवण्यात येईल. ३० ऑक्टोबर २०१९ ला समितीचा अहवाल येईल. त्यानंतर कार्यवाही करू. पंतप्रधान आणि दोन कृषिमंत्र्यांनी लिखित आश्वासन दिल्यानंतरही स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही, असेही ते म्हणाले.
शेतकरी आंदोलनातच हिंसा नाही. अहिंसेच्या मार्गानं आंदोलन सुरू आहे. सरकारने पाच वेळेस बैठका घेऊनही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. मला लिखित आश्वासनं देऊनही मागण्या मान्य केल्या नाहीत. आता कृषिमंत्री आश्वासनं पूर्ण करणार का? असा सवालही अण्णांनी केला.
देशभरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे. सरकारचं नाक दाबल्यानंतर तोंड उघडलं पाहिजे, अशी स्थिती निर्माण केल्यानंतरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील. माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे. कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता दिली नाही आणि स्वामीनाथन आयोगानुसार पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव शेतकऱ्यांना न दिल्यास मी पुन्हा एकदा आंदोलन करेन, असा इशारा मी सरकारला दिला आहे, असे अण्णांनी सांगितले.