राळेगणसिध्दी : मागण्यांबाबत सरकारने सरकारात्मक पावले उचलली आहेत. उवर्रित मागण्यांसाठी चार महिन्यांचा कालावधी मागितला आहे. त्यामुळे आम्ही दोन पावले मागे येण्याचा निर्णय घेता असून आजपासून सुरु होणारे उपोषण स्थगित करत असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. चार महिन्यांच्या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एकदा ३० जानेवारीपासून एकदा उपोषण करणार असल्याची भुमिकाही अण्णा हजारे यांनी यावेळी मांडली.जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यामध्ये दोन तासांच्या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधण्यात आला.अण्णा हजारे म्हणाले, सरकार आमच्या देशाचे असल्यामुळे सरकारवर विश्वास आहे. चर्चा करुन प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले पाहिजे. सरकारने चार महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने मागण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे आम्हीही दोन पावले मागे आलो आहोत. चार महिन्यांच्या कालावधीत उवर्रित मागण्या मान्य न झाल्यास महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा उपोषण करणार आहे. या उपोषणाचे ठिकाण देशातील कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ठरवले जाईल.महाजन म्हणाले, देश भ्रष्टाचारमुक्त व्हावा ही अण्णांची भुमिका आहे. तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा अशीही त्यांची मागणी आहे. हीच भुमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही आहे. त्यासाठी काम सुरु आहे. अण्णांच्या महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. राज्यात लोक आयुक्त नेमण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचेही महाजन यांनी सांगितले.