राळेगणसिद्धी : सातत्याने होणारी बदनामी किंवा अपमान पचविल्यामुळे जर समाजाचे, राज्याचे व देशाचे नुकसान होणार असेल तर असा अपमान पचविणे दोष ठरेल, अशी माझी धारणा आहे. खटाशी खट, धटाशी धट व उद्धटाशी उद्धट झालेच पाहिजे, अशा संत पंक्तींचा हवाला देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जाणीवपूर्वक आपले नाव जोडून बदनामीचा प्रयत्न सध्या माध्यमांमधून सुरू असल्याचा आरोप केला आहे. अशी बदनामी करणा-यांविरूद्ध न्यायालयात बदनामीचे खटले दाखल करणार असल्याचा इशारा हजारे यांनी गुरूवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.या पत्रकात अण्णा हजारे यांनी म्हटले आहे की, दिल्ली येथील आंदोलनात सहभागी कल्पना इनामदार या नथूराम गोडसे यांची नात असल्याच्या व त्यांच्याहाती या आंदोलनाची सर्व सूत्रे अण्णांनी सोपविल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक त्यांचा व माझा पूर्वी कधी परिचय नव्हता. आंदोलनासाठी विविध राज्यातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी इनामदार एक होत्या. त्यांच्याकडे आंदोलनाची कोणतीही सूत्रे सोपविलेली नव्हती. कार्यकर्त्यांनी आंदोलनाची कामे विभागून घेतली. त्यानुसार इनामदार यांनी मंडप व मंच व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती. आंदोलनाची सर्व सूत्रे मी स्वत: हाताळली. इनामदार यांना आंदोलनाचे मुख्य सूत्रधार करून माझा संघाशी संबंध जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. किती खोटे बोलावे याचे सुद्धा बदनामी करणा-या चौकडीला भानच राहिलेले नाही.माजी मंत्री नबाब मलिक यांनी एका चॅनेलवर चक्क खोटा आरोप करताना अण्णांनी संघाच्या शाखेत दहा वर्षे प्रशिक्षण घेऊन त्यानंतर सामाजिक काम सुरू केल्याचे सांगितले. विशिष्ट वर्गाकडून माझे नाव संघाशी जोडण्याचा प्रयत्न करून काही मंडळी मला व आंदोलनास जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे रॅकेट चालवित आहेत. गेली २५ वर्षे राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्षाचा, व्यक्तीचा विचार न करता मी आंदोलने करीत आलो. आमच्या आंदोलनामुळे विविध पक्षांच्या मंत्र्यांना घरी जावे लागले. त्यामुळे त्या त्या पक्षांची मोठा हानी झाली. पण स्वत: भ्रष्ट असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत. आंदोलनामुळे राजकीय पक्षांची ‘धरले तर चावते अन् सोडले तर पळते’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीकाही हजारे यांनी केली.
मी गेली २५ वर्षे समाज, राज्य आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही पक्ष, पार्टी व व्यक्तिचा विचार न करता आंदोलने करीत आलो. दुकानातील रेडिमेड कपडे कुणाला ना कुणाला येतच असतात. पण त्यांना असे वाटते की, हे आमच्यासाठीच शिवलेले आहेत. त्याप्रमाणे आम्ही जरी व्यक्ती, पक्ष, पार्टी समोर ठेवून आंदोलन करीत नसलो तरी अशा लोकांना आमचे आंदोलन कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या विरोधात किंवा बाजूने केलेले भासते.-अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक