पारनेर : केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव, पिकांसाठी नांगरणीसह अधिक ५० टक्के उत्पादन खर्च द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण दिल्लीत करायचे की राळेगणसिध्दीत याबाबत अजून निर्णय झाला नाही.
केंद्र सरकारने दिल्लीत अजून आंदोलनासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही. दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली व राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असणारा स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या असे सांगितले होते. मात्र दोन वर्षे उलटूनही केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी केली नसल्याने शेतकऱ्यांना अजूनही पिकांना हमीभाव दिला जात नाही. शेतकऱ्यांना बियाणे, नांगरणी खर्च धरून उत्पादन खचार्वर ५० टक्के खर्च धरून हमीभाव दिला पाहिजे असे आश्वासन दिले होते. त्याची अंमलबजावणी दूर राहिली. उलट शेतकऱ्यांच्या पिकांच्या हमीभावमध्येच केंद्र सरकारने रक्कम कमी केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. केंद्रीय कृषीमूल्य आयोग सध्या कृषिमंत्री यांच्या अखत्यारीत असून त्या आयोगाला स्वायत्तता द्यावी, अशी मागणी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.