राळेगणसिध्दी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. हजारे हे ३० जानेवारीपासून शेतकर-यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, आज अण्णांची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चाैधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसदभार्त उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.
अण्णा हजारे हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, स्वामीनाथन आयोगाची अंमबजावणी करावी, या व शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी अण्णांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजीमंत्री राधाकृष्ण विखे, गिरीश महाजन, बबनराव पाचपुते यांनी अण्णांची राळेगणसिध्दीत भेट घेतली.
भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले की, कोरोनामुळे अण्णांनी सुचिवलेल्या प्रश्नांना उशीर झाला. आता अण्णांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रात उच्चस्तरीय कमिटी स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी दिल्लीत बैठक आयोिजत करणार असून यावेळी अण्णा हजारे हेही उपस्थित राहतील. समितीतील सदस्यही अण्णाच सुचवतील.
कृषी राज्यमंत्री चौधरी म्हणाले, शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत अण्णांच्या प्रत्राची केंद्राने वेळवेळी दखल घेतली आहे. त्यात अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. आणखी जे प्रश्न आहेत, ते कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील.
अण्णा हजारे म्हणाले, केंद्राला सूचविलेल्या मुद्यांना उशीर झाला. तो त्यांनी मान्य केला. मी केंद्राला १५ मुद्दे सुचविले होते. हे मुद्दे आता कमिटीच्या माध्यमातून सोडविले जातील. हे प्रश्न सुटले तर शेतक-यांना दिलासा मिळेल. आज दिलेल्या आश्वासनामुळे मी उपोषण मागे घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.