अहमदनगर : फळाची अपेक्षा न करता केलेले कोणतेही कर्म ही ईश्वर सेवा असते. हे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दाखवून दिले, असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठीवर हात ठेवत, मी कुठल्याच पुढाऱ्यांच्या पाठीवर हात ठेवत नाही. पण, तुमच्या पाठीवर हात ठेवत आहे़ तुम्ही चांगले काम कराल, अशी अपेक्षा व्यक्त केली.कॅबिनेटमंत्री शंकरराव गडाख यांनी शुक्रवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. अण्णांचे राळेगणसिद्धी येथे मौनव्रत सुरू आहे. त्यांनी गडाख यांच्याशी लेखी स्वरुपात संवाद साधला. यावेळी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख उपस्थित होते. शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, त्याग हे गुण अंगी असावे लागतात. काही वेळेला हे गुण असूनदेखील काही लोक विरोध करतात. निंदा करतात. सत्तेचा उपयोग रस्ते, पूल उभे करणे, धरणे बांधणे अशा लोकोपयोगी कामांसाठी करावा़ माणसे विकासापासून दूर जात असतील तर त्या कर्माला अर्थ राहत नाही, असे अण्णांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
पाठीवर हात ठेवत अण्णांनी दिले गडाखांना आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 3:34 AM