Nilesh Lanke ( Marathi News ) : महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कांद्याचे घसरलेले दर हा मुद्दाही चांगलाच चर्चिला गेला. कांदा निर्यातबंदीवरून महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला होता. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनीही निवडणुकीदरम्यान कांदा आणि दूध दराचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच १५ मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आज सकाळी लंके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीत आचारसंहितेमुळे आज आंदोलन न करता मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचं जाहीर केलं.
निलेश लंके यांनी म्हटलं आहे की, "माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो मागील महिन्यात मी दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले की १५ तारखेला म्हणजेच आज आपण कांदा आणि दूध दरवाढीसंदर्भात भव्य आंदोलन करू असा शब्द दिला होता. कारण, सध्या शेतकरी बांधवांच्या या जीवनावश्यक प्रश्नासाठी भव्य जनआंदोलन उभा करण्याची गरज आहे. पण सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता अजूनही लागू असल्याने, मी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कांदा आणि दूध दरवाढीची मागणी करणार आहे," अशी माहिती लंके यांनी दिली.
"आंदोलन केल्याशिवाय या प्रशासनाला आणि सरकारलाही जाग येणार नाही. आंदोलनाची दिशा आणि धोरण आचारसंहिता संपली की ठरवू आणि एकत्रित मिळून एक व्यापक लढा उभारू, आपण कुणीही नगर येथे येऊ नये, आपल्याला आंदोलनाची पुढील तारीख आणि वेळ कळविली जाईल," असं निलेश लंके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यंदा विद्यमान खासदार सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना रंगला होता. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. नगरमध्ये यंदा अटीतटीची लढत झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण विजयी होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.