शिर्डी : राहाता तालुक्यातील निमगावचे कोरोना कनेक्शन आता तालुक्याच्या पूर्व भागात पोहचले आहे. शुक्रवारी (दि.१ जून) ममदापूर येथील एका तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यात चार दिवसात कोरोना बाधीतांची संख्या आठवर गेल्याने तालुका प्रशासन हादरले आहे. चार दिवसांपूर्वी निमगाव येथील एक भाजी विक्रेत्या महिलेला कोरानाची लागण झाल्याचे समोर आले होते. या महिलेने शिर्डीच्या साईबाबा रूग्णालयात चार दिवस ओपीडी बेसीसवर उपचार घेतले होते. या भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगाही संस्थान रूग्णालयात सुरक्षा रक्षक आहे. तो २० मे पासून कामावर आलेला नव्हता. मात्र आईला उपचारासाठी तो घेवून आला होता़. शुक्रवारी ममदापुरातील कोरोनाबाधीत सापडलेला मुलगा या भाजी विक्रेत्या महिलेच्या मुलाचा सहकारी व मित्र आहे.
शुक्रवारी रात्री या ममदापुरच्या तरूणाला त्रास जाणवू लागल्याने त्याच्यासह त्याच्या कुटूंबातील पाच जणांना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते. त्यातील अन्य चार जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हा तरुण २८ रोजी साईबाबा रूग्णालयात रात्रपाळी करून गेलेला आहे़. या घटनेमुळे संस्थान रूग्णालयातील कर्मचा-यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.