शेवगाव : तालुक्यातील कऱ्हेटाकळी येथील एकाने काळवीटाची शिकार केली. याची माहिती खबऱ्याकडून वनविभागाला मिळताच पथक संबंधिताच्या घरी गेले. मात्र, तोपर्यंत त्याने पलायन केले. यावेळी पथकाने एक दुचाकी, काळवीट मारण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड, सुरे, जाळे जप्त करण्यात आले. ही घटना शनिवारी घडली.
कऱ्हेटाकळी येथील पटेल अंकुश पवार (वय ३५) याने काळवीटाची शिकार करून त्याला घरी घेऊन गेल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक सुनील पाटील यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच पटेल पवार याने पलायन केले. हा प्राणी वन्यजीव अधिसूची ‘एक’मधील असल्याने पटेल पवार याच्याविरुद्ध वन्य प्राणी संरक्षण अधिनियम- १९७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी एक दुचाकी, कुऱ्हाड, सुरे, जाळे जप्त केल्याचे पाटील यांनी सांगितले. वनपाल पांडुरंग वेताळ, वनरक्षक आप्पा घनवट, स्वाती ढोले, नौशाद पठाण, वनसेवक विष्णू सोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.