पारनेर : बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात सुजित झावरे गट व शिवसेनेच्या १३ संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. २५ आॅक्टोबर रोजी यासाठी सभा होणार आहे.राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले सुुजित झावरे यांचा गट व शिवसेनेचे संचालक एकत्र झाले आहेत. त्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्याचे ठरविले आहे. गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेचे संचालक काशिनाथ दाते, अशोक कटारिया, युवराज पाटील यांच्यासह उपसभापती विलास झावरे, झावरे गटाचे संचालक अरूण ठाणगे, राहुल जाधव, गंगाराम बेलकर, राजेश भंडारी यांच्या त्या ठरावावर सह्या आहेत. गायकवाड यांच्या बाजूने संचालक शिवाजी बेलकर, अण्णासाहेब बढे, संगीता कावरे, राजश्री शिंदे हे चार संचालक असून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर २५ आॅक्टोबरला विशेष सभा होणार असल्याने याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.याबाबत गायकवाड म्हणाले, चांगुलपणाचे समाजकारण मोडीत काढण्यासाठी पारनेर तालुक्यातील प्रस्थापित पुढारी एकत्र आले. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी पारनेर तालुक्यात प्रस्थापितांची अभद्र युती झाली आहे. बाजार समितीत काम करत असताना शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे.
प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात अविश्वास ठराव; पारनेर बाजार समितीत २५ आॅक्टोबरला बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:42 PM