अहमदनगर : मोठा गाजावाजा करून कोरोना लसीकरणास सुरुवात झाली खरी, मात्र नोंदणी करूनही कोरोना लस घेण्यासाठी प्रशासनातील कर्मचारी पुढे येताना दिसत नाहीत. आजपर्यंत ४१ हजार ७५९ कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यातील २६ हजार ४४८ जणांनी आज अखेर लस घेतली आहे. अजूनही १५ हजार ३११ जण लस घेण्यासाठी आलेले नाहीत.
राज्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्याचे ठरले. लसीकरणासाठी कोवीन ॲपवर नोंदणी केल्यानंतर कोणत्या दिवशी, कोणत्या लसीकरण केंद्रात लस घेण्यासाठी यायचे याचा संदेश संबंधिताला आरोग्य विभागाकडून गेला. नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी व महिला बालकल्याण कर्मचारी असे ४१ हजार ७५९ कर्मचाऱ्यांनी नोंदणी केली.
१६ जानेवारीला लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात लसीकरण केंद्र कमी होते. नंतर ते वाढवण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत ४१ हजार ७५९पैकी २६ हजार ४४८ जणांनी कोरोना लस घेतली आहे. त्यात ३ हजार २७४जण महसूल, पोलीस व इतर फ्रंट लाइन वर्कर यांचा समावेश आहे.
सध्या ८ शहरी व १६ ग्रामीण अशा एकूण २४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर कमाल १०० जणांना दरदिवशी लस दिली जाते. परंतु नोंदणी केलेले अनेक कर्मचारी ठरलेल्या दिवशी लस घेण्यास येत नाहीत. परिणामी अनेक केंद्रांवर १००पेक्षा कमी लसीकरण होते. ज्यांनी लसीकरण चुकवले त्यांना पुन्हा लस घ्यायची असेल तर त्या भागातील नोंदणी केलेले कर्मचारी संपेपर्यंत वाट पहावी लागते. ठरलेल्या दिवशी लस न घेणाऱ्यांची संख्या १५ हजार आहे. शासनाने मोफत लस देऊनही व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून एवढी मेहनत घेऊनही लस घेण्यासाठी एवढी अनास्था का दाखवली जाते, हा प्रश्न आहे.
---------
दुसरा टप्पा सुरू
ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला त्यांनी महिनाभरानंतर दुसरा डोस घेणे अनिवार्य आहे. १७ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता या दुसऱ्या टप्प्याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष आहे.
--------------
आतापर्यंतची लसीकरण नोंदणी-४१,७५९
प्रत्यक्ष लसीकरण झाले-२६,४४८
लसीकरण बाकी-१५,३११
-------------
ग्रामीण भागात आता लसीकरणाचा टप्पा वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस दिली जाणार आहे. २० फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
-----------
फाईल फोटो - कोरोना लस