अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील तिन्ही आरोपींनी गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याबाबतचा अर्ज न्यायालायाकडे सादर केला आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, तिघा आरोपींवर दोष निश्चिती करण्यात यावी, याबाबतचे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाले. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे आॅक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडातील नियमित सुनावणी प्रक्रिया प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर सोमवार (दि. २५) पासून सुरू झाली. या हत्याकांडातील आरोपी प्रशांत जाधव, अशोक जाधव आणि दिलीप जाधव यांच्यावरील आरोप निश्चित करण्यासाठी सोमवारी सुनावणी झाली. या खटल्यात दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील अॅड. उमेशचंद्र यादव यांनी आरोपींविरुद्ध पुराव्यांची मालिकाच सादर केली. त्यामुळे आरोपींवर दोष निश्चित करून नियमित सुनावणी घ्यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर तिन्ही आरोपींनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज दिला. त्यावर आता शुक्रवारी (दि.२९) सुनावणी होणार आहे. दरम्यान, आरोपींनी यापूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर २ मे रोजी सुनावणी होणार आहे.(प्रतिनिधी)
दोषमुक्ततेसाठी आरोपींचा अर्ज
By admin | Published: April 25, 2016 11:10 PM