श्रीगोंदा : तालुक्यातील वाळू, माती, मुरुम तस्करीच्या विरोधात श्रीगोंदा तहसील कार्यालयाने दोन पोलिसांचा समावेश असलेले भरारी पथक तैनात केले आहे. हे पथक २४ तास काम करणार आहे.भीमा, घोड, सरस्वती, हंगा देव व इतर काही ओढ्यातील वाळू तस्करी महसुल विभागाची डोकेदुखी बनली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार श्रीगोंद्यात विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी प्रांताधिकारी गोविंद दानेज, तहसीलदार महेंद्र महाजन यांनी छापे टाकून वाळू वाहतूक करणा-या नऊ ट्रक पकडून सुमारे १८ लाखाचा दंड केला. नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन ट्रक पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार नदी पात्रात उभ्या असलेल्या ट्रकला दोन लाख, टॅक्टर एक लाख तर जेसीबी पोकलेट यांना साडेसात लाखाचा दंड करण्याचा फतवा जारी केला आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.वाळू तस्करांच्या खबरे प्रशासनाच्या कारवाईत अडथळे ठरत आहेत. त्यामुळे खब-यांच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे खबरे रडारवर येणार आहेत. वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जाणा?्या पथकास गाडी नव्हती. आता गाडी उपलब्ध झाली असुन दोन पोलिस पुर्ण वेळ मिळाले आहेत. तीन दिवसात ९ ट्रक मालकांना दंड करण्यात आला. -महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदा