अहमदनगर : जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या बैठकीत ४ कोटी ७० लाख रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यात पहिल्यांदा मागासवर्गीय समाजातील मुलांना सायकल, तर १२ वी पास मुलींना टॅबलेट मिळणार आहे. सभापती शाहूराव घुटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी समाज कल्याण समितीची बैठक झाली. यात विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली. यात यापुढे मागसवर्गीय समाजातील मुलींसोबत मुलांना सायकल वाटप करण्यात येणार आहे. पहिली ते पाचवीच्या मुलींना रेनकोट, मागासवर्गीय शेतकर्यांना तुषार सिंचन संच, दहावी पास मुलींना संगणक प्र्रशिक्षण, शेतीसाठी विद्युत पंप, समाजमंदिरांना सतरंजी पुरवणे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ग्रामपंचायतींना आणि समाज मंदिरांना पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. सभेला सदस्य रावसाहेब साबळे, उज्वला शिरसाठ, तुकाराम शेंडे, मीरा चकोर, अनिता पवार, संगीता गायकवाड आणि समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले उपस्थित होते. सभेत मंजूर करण्यात आलेल्या तरतुदी पुढील मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) मुलींची सायकल योजना ५० लाख, मुलांची सायकल योजना ४० लाख, रेनकोट योजना ५० लाख, तुषार सिंचन योजना ५० लाख,संगणक प्रशिक्षण योजना ५० लाख, पत्रापेटी योजना ५० लाख, शेती पंप योजना १० लाख, सतरंजी खरेदी करणे २६ लाख, मुलींसाठी टॅबलेट ४० लाख, स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके खरेदी योजना ३० लाख आणि सौर कंदील योजनेसाठी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
पावणे पाच कोटींच्या योजनांना मंजुरी
By admin | Published: May 23, 2014 1:25 AM