राहुरी : डिग्रस ग्रामपंचायतीत उपसरपंचाविरुद्ध १२ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी विशेष सभेत मतदान झाले. सरपंच व १७ सदस्य असे अठरा जण मतदानास पात्र होते. उपसरपंचासह चार सदस्य सभेला गैरहजर राहिले. सरपंचासह १४ जणांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. प्रस्ताव चौदाविरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. त्यामुळे, उपसरपंच मधुकर पवार पदावरून पायउतार व्हावे लागले.
मंगळवारी सकाळी १० वाजता तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली डिग्रस ग्रामपंचायतीच्या कार्यालयात उपसरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर विशेष सभा झाली. उपसरपंच मधुकर पवार पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायतीमध्ये मनमानी पद्धतीने कारभार करतात. सदस्यांना विश्वासात घेत नाहीत. शासकीय योजना राबवित नसल्याने गावाला विकासापासून वंचित ठेवले. मासिक सभेत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करीत नाहीत, असा ठपका ठेवून १२ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
मतदानासाठी विशेष सभेला सरपंच पोपट बर्डे, अविनाश भिंगारदे, ज्ञानेश्वर भिंगारदे, संतोष बेल्हेकर, अनिता भिंगारदे, अश्विनी ओहोळ, सुनिता गावडे, गोरक्षनाथ देशमुख, अंजली साळुंके, रावसाहेब पवार, रंजना कसबे, मंगल आघाव, ज्योती पवार, अनिल शिंदे उपस्थित होते. त्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभेस उपसरपंच मधुकर पवार, सदस्य सोनाली बेल्हेकर, सुनिता जाधव, लता गिरगुणे हे गैरहजर राहिले.
....
डिग्रस ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह चौदा जणांनी उपसरपंचावरील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने कौल दिला. आजच्या सभेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. येत्या आठ-दहा दिवसांत सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाच्या रिक्त पदाच्या निवडीसाठी सभा होईल.
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी.