अहमदनगर : दिवाळीत नागरिक नातेवाईक, मित्रांच्या भेटीसाठी बाहेरगावी जात असतात. दिवाळीच्या काळात बंद असलेल्या घरांना लक्ष्य करीत चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शहरासह ग्रामीण भागातही चोरट्यांनी दागिने, रोख रक्कम, वाहने लंपास करून दिवाळी साजरी केली आहे.
दिवाळी सणात नागरिक घर बंद करून गावाकडे, नातेवाइकांकडे जातात. त्यामुळे चोरट्यांसाठी हा सुगीचा काळ असतो. बस स्थानकांत होणारी गर्दी, बंद घरे हेरून चोरटे हात साफ करण्याची संधी सोडत नाहीत. प्रवासात दागिने चोरीच्या घटनांसह वाहने, कपाटातील दागिने चोरीच्या घटना दिवाळीच्या काळात घडल्या आहेत. दिवाळीच्या कालावधीत चोरट्यांचा धुडगूस असतो. त्यामुळे पोलिसांनी दिवाळीपूर्वीच आवाहन केले होते.
याशिवाय, शहरासह ग्रामीण भागातील गस्तही वाढविण्यात आली होती. मात्र, नागरिकांसह पोलिसांनाही चकवा देत चोरट्यांनी मौल्यवान दागिने, मोटारसायकली, रोख रक्कम लंपास केली. अनेक कुटुंबे बाहेरगावी जातात. अशा बंद घरांवर पाळत ठेवून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लांबविली असून, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास लागत नाही. त्यामुळे एकदा चोरीला गेलेला माल परत मिळत नाही. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.
नवीन मोटारसायकली लांबविल्यादिवाळीच्या मुहूर्तावर अनेकांनी मोटारसायकलसह अन्य वस्तूंची खरेदी केली. या मोटारसायकलीही चोरट्यांनी चोरून नेल्याच्या घटना दिवाळीच्या काळात घडल्या. वाहन चोरीचे प्रमाण दिवाळीनंतर वाढले असून, चोरी रोखण्याचे आवाहन पोलीस दलासमोर आहे.
आठवडाभरात ८० हून अधिक चोरीच्या घटनादिवाळीच्या काळात शहरासह जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात ८०हून अधिक ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी बंद असलेली घरे, दुकाने फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
धान्याचा ट्रक पळविलादिवाळीच्या काळात नगर - औरंगाबाद महामार्गावरील इमामपूर घाटात नगरकडे येत असलेल्या धान्याचा ट्रक चोरट्यांनी चालकाला दमदाटी करत पळवून नेला. हा ट्रक चोरट्यांनी नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरात सोडून ते पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवसानिहाय लंपास मुद्देमाल२३ ऑक्टोबर, घटना - ९, ५ लाख२५ ऑक्टोबर, घटना - १३, ४ लाख ५० हजार२६ ऑक्टोबर, घटना - १०, ७ लाख२७ ऑक्टोबर, घटना - १६, ९ लाख ५५ हजार२८ ऑक्टोबर, घटना - १५, १२ लाख ४५ हजार२९ ऑक्टोबर, घटना - १३, १० लाख ३५ हजार३० ऑक्टोबर घटना - २१, १० लाख २२ हजार
ऐन दिवाळीत एसपी बदलले, चोरट्यांनी साधला डावदिवाळीत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बदलले. ऐन दिवाळीत जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राकेश ओला यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस दलात अचानक झालेल्या बदलामुळे अधिकारी व कर्मचारीही व्यस्त होते. ही संधी साधत चोरट्यांनी डाव साधला.