अहमदनगर : शहरातील दिल्लीगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दोन गटात वाद होऊन त्याचे पर्यावरण हाणामारीत झाले. ही घटना शुक्रवारी ( दि.१२) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी दोन्ही गटाच्या सुमारे ६१ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार रविराज अजय साळवे याच्यासह ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या गटाचे राहुल अजय साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय पठारे याच्यासह २४ जणांवर गुन्हे झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नीलक्रांती चौकात कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात येऊन अण्णाभाऊ साठे यांचा फोटो का लावला नाही, अशी विचारणा करत काहींनी गोंधळ घातला. यावरून कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी काहींच्या घरावर दगडफेक करून खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.
या हाणामारीत तिघेजण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर दोन्ही गटाच्या महिलांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तोफखाना पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या दिला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले. त्यानतर वातावरण निवळले. यावेळी शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती, कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रताप दराडे उपस्थीत होते.