अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे. या प्रकरणातील तिसरा दोषी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या वतीने अॅड़ प्रकाश आहेर हे प्रथम युक्तिवाद करणार आहेत.अॅड़ आहेर यांचा युक्तिवाद झाल्यानंतर दोषी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांच्या वतीने अॅड़ योहान मकासरे व अॅड़ बाळासाहेब खोपडे युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हे दोषींना काय शिक्षा द्यावी, यावर युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर न्यायालय दोषींना शिक्षा ठोठावणार आहे.कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याला १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने कटकारस्थान, छेडछाड, अत्याचार, खून तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (पोक्सो) दोषी धरले. इतर दोघांना अत्याचार, खुनाच्या कटात सहभागी होणे व प्रोत्साहन देणे, तसेच पोक्सो कायद्याखाली दोषी धरण्यात आले. कायद्यातील या कलमांसाठी जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या आरोपींना आता काय शिक्षा मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. कोपर्डी खटल्यातील संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्हा न्यायालयात मंगळवार व बुधवारीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारी युक्तिवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 7:18 PM