अहमदनगर : नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरात लष्कराचा दारुगोळा, स्फोटकांचा साठा आढळून आला असून, आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व पुणे येथल सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. आरोपीकडील सर्व दारुगोळा व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दिनकर त्रिंबक शेळके (वय ६५, रा. कर्जुने खारे) असे आरोपीचे नाव आहे. खारे कर्जुने गावाला लागूनच सैन्याचे युद्ध सराव क्षेत्र आहे.
दिनकर शेळके हा त्यांचे राहते घरी भारतीय सैन्य दलात वापरला जाणारा दारुगोळा व स्फोटक पदार्थ अवैधरित्या कब्जता बाळगतो आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला साहेब, पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पुणे येथील सदन कमान मिलेट्री इंटेलिजेन्स विभाग, दहशतवाद विरोधी शाखा, बीडीडीएस अहमदनगर व एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी खारे कर्जुने येथे शेळके याच्या घरी छापा टाकला.
पथकाने दिनकर शेळके यास ताब्यात घेऊन पत्र्याच्या शेडमध्ये आडगळीच्या सामानाखाली ठेवलेला दारुगोळा, स्फोटके हस्तगत केली. यामध्ये १८ टॅन्क राऊंड, ५ मोटार राऊंड, ८ ॲम्युनेशन पिस्टल राऊंड, १६ पिस्टल राऊंड, ४० स्विचेस, लाल पिंवळी वायर बंडल व २५ किलो टीएनटी पावडर अशा मुद्देमालाचा समावेश आहे. आरोपी विरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ४ व भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.