अहमदनगर : नगर शहरातील सीना नदीकाठी अमृत योजनेतंर्गत करण्यात येणाऱ्या वृक्षलागवडीचे काम सेनेच्या नगरसेवकांनी बंद पाडले. त्यामुळे सीना नदीकाठच्या हरित पट्ट्यावरून सेना-भाजपात चांगलीच जुंपण्याची चिन्हे आहेत.
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतंर्गत शहरातून जाणाऱ्या सीना नदीकाठी हरितपट्टा विकसित करण्यात येत आहे. सुमारे २ कोटी १४ लाख रुपये खर्चून हा प्रकल्प राबिवण्यात येत आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तशी घोषणा वाकळे यांनी अंदाजपत्रकीय सभेत केली होती. सीना नदीकाठी रेल्वेस्टेशन परिसर, वारुळाचा मारुती आणि धर्माधिकारी मळा या भागात देशी वृक्षांची लागवड करणे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने रेल्वेस्टेशन परिसरातील जुना लोखंडी पूल भागात वृक्षलागवड सुरू केली होती. हा परिसर प्रभाग क्रमांक -१५ मध्ये तर, वारुळाचा मारुती हा भाग प्रभाग क्रमांक-८ मध्ये येतो. या दोन्ही प्रभागांत शिवसेनेचे नगरसेवक आहेत. सेनेच्या नगरसेवकांचा सीना नदीकाठी हरितपट्टा विकसकत करण्यास विरोध असून, त्यांनी हे काम बंद पाडले. त्यामुळे सीना नदीकाठचा हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
शहरातील प्रदूषण व तापमान कमी व्हावे, यासाठी हा प्रकल्प राबिवण्यात येत आहे. रेल्वेस्टेशन येथून प्रकल्पाला सुरुवात केली होती. तसेच महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागातील धर्माधिकारी मळ्यात हरितपट्टा विकसित करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी कुणाचाही विरोध नाही. त्यामुळे धर्माधिकारी मळ्यात वृक्षलागवडीचे काम जोरात सुरू आहे. परंतु, रेल्वेस्टेशन व वारुळाचा मारुती परिसरातील वृक्ष लागवडीचे काम थांबविण्यात आले आहे.
.....
महापौरांच्या भूमिकेकडे लक्ष
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सीना नदीकाठी हरितपट्टा विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्पाला सुरुवातही झाली होती. परंतु, हे काम सेनेच्या नगरसेवकांनी बंद पाडले असून, याबाबत महापौर वाकळे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.