अहमदनगर : पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात सहभागी रणगाडे, सध्या लष्करी ताफ्यात असलेली यांत्रिकी सामग्री, विविध क्षेपणास्त्रे, बंदुका याची माहिती देत येथील आर्मर्ड कोअर सेंटर अॅण्ड स्कूलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी नगरकरांना सैन्यदलाची ओळख करून दिली. स्वातंत्र्यदिनी सोलापूर रस्त्यावरील रणगाडा संग्रहालयात एसीसी अॅण्ड एसतर्फे ‘नो यूवर आर्मी’ हा लष्करी विभागाचा माहितीपर उपक्रम राबवण्यात आला. नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या लाडक्या सैन्यदलातील कामकाजाची माहिती कुतूहलाने जाणून घेतली. रणगाडा संग्रहालय राष्ट्रीय सण असताना नागरिकांसाठी खुले करण्यात येते. याला जोडून लष्कराने यंदा हा आगळावेगळा उपक्रम राबवला. भल्या सकाळीच येथे लष्कराच्या ताफ्यात असलेले लढाऊ रणगाडे दाखल झाले. सैन्याचे स्फूर्तीदायक बॅण्डपथक, लष्करी भरतीचे मार्गदर्शन, तसेच विविध क्षेपणास्त्रे याची माहिती नागरिकांना लष्करी अधिकारी देत होते. लहान मुलांसह हौशी सैन्यप्रेमींनी प्रत्यक्ष रणगाड्यात बसून त्याची माहिती घेतली. बंदूक कशी चालवावी, क्षेपणास्त्रे केव्हा डागतात, रणगाड्यांचे युद्धातील योगदान आदींसह अनेक प्रश्नांची उत्तरे लष्करी अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली. दरम्यान, सैनिकी बॅण्डच्या निनादात, देशभक्तीपर गीते अशा प्रसन्न वातावरणात नागरिकांना सैन्यदलाची सफर घडली. (प्रतिनिधी)
रणगाडा संग्रहालयात लष्कराचे प्रदर्शन
By admin | Published: August 17, 2015 12:01 AM