लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे अविनाश घुले यांच्याविरोधात शिवसेनेचे विजय पठारे यांनी बुधवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध इतर असा सामना रंगणार की सेना ऐनवेळी तलवार म्यान करणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिका स्थायी समिती सभापती निवडीसाठी गुरुवारी दुपारी महापालिकेत सभा बोलविण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून घुले यांनी मंगळवारी चतुर्थीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थायी सदस्य विजय पठारे यांचा अर्ज दाखल करत बुधवारी सेनेने या निवडणुकीत उडी घेतली. चार महिन्यांपूर्वी झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीतही सेनेने योगीराज गाडे यांचा अर्ज दाखल केला होता. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने मनोज कोतकर हे बिनविरोध सभापती झाले. यावेळीही सेनेने पठारे यांचा अर्ज दाखल केला असून, वरिष्ठांकडून सूचना आल्यानंतर अर्ज मागे घ्यायचा की निवडणूक लढवायची, याचा निर्णय होणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.
राज्यात राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेसची महाविकास आघाडी आहे. अहमदनगरमध्ये मात्र राष्ट्रवादी व शिवसेनेत संघर्ष आहे. राष्ट्रवादीने सेनेला दूर ठेवून भाजपची मदत घेतली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीचे घुले यांचा अर्ज दाखल करताना महापौर बाबासाहेब वाकळे, सभागृहनेते मनोज दुल्लम, उपमहापौर मालन ढोणे यांचे चिरंजीव संजय ढोणे हे हजर होते. तसेच भाजपने राष्ट्रवादीचे घुले यांच्याविरोधात अर्ज दाखल न करता सपशेल माघार घेतली. भाजपने राष्ट्रवादीला साथ दिल्याने महापालिकेत सेनेची अडचण झाली असून, वरिष्ठ काय निर्णय घेतात, त्यावरच सर्वकाही अवलंबून आहे.
...
राज्यात एकत्र, नगरमध्ये आमने-सामने
राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले. नगरमध्ये सेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजप सत्तेवर आहे. त्यात आता स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतली असून, घुले यांचा अर्ज दाखल करताना महापौर वाकळे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवकांनीही हजेरी लावली. सभापती पदासाठी भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले असून, राज्यात एकत्र असलेल्या राष्ट्रवादी व सेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.