अहमदनगर : शिवसेनेने घोषित केलेले महापौरपदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. याशिवाय काही धोका होऊ नये, याची खबरदारी म्हणून योगिराज गाडे किंवा गणेश कवडे यांच्यापैकी एकाला अर्ज दाखल करण्याच्या हालचालीही शिवसेनेत सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे भाजपने कोणालाही उमेदवारी जाहीर केली नसली तरी नगरसेवक बाबासाहेब वाकळे बुधवारीच अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप महापौरपदाची निवडणूक स्वतंत्र लढविणार असल्याने या निवडणुकीवर राष्ट्रवादी काँग्रेसही नजर ठेवून आहे.महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी (दि. २८) होत आहे. त्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब बोराटे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ‘बाळासाहेब बोराटे यांना शिवसेनेतूनच विरोध’ असे वृत्त ‘लोकमत’च्या मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी हालचाल करीत नगरमध्ये असलेल्या नगरसेवकांना सहलीवर जाण्यासाठी बजावले. नव्याने निवडून आलेले निम्मे नगरसेवक सहलीवर असून जुने नगरसेवक नगरमध्येच आहेत. राठोड यांनी सांगितल्यानंतरही त्यांनी सहलीवर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बोराटे चांगलेच हादरले आहेत. ऐनवेळी कोणताही धोका नको म्हणून शिवसेना योगिराज गाडे किंवा गणेश कवडे यांच्यापैकी एकाला महापौर-पदाच्या निवडणुकीत उतरविण्याची शक्यता आहे. तशा हालचाली शिवसेनेत सुरू होत्या. गाडे मैदानात आले तर महापालिकेतील चित्र बदलण्याची शक्यताही व्यक्त झाली आहे. भाजपने अद्याप कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. महापौर होण्याची वाकळे यांची इच्छा आहे. त्यामुळे ते प्रयत्न करीत असतील तर माहिती नाही, असे भाजपचे नेते सांगत आहेत. दुसरीकडे भाजपचे १४ ही नगरसेवक सहलीवर असून एकत्र आहेत. त्यांना बहुजन समाज पक्षाच्या तीन नगरसेवकांची साथ मिळाल्याची चर्चा आहे. शिवाय सेनेचेही काही नाराज नगरसेवक वाकळे यांना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी वाकळे यांचे पारडे जड मानले जात आहे. वाकळे यांच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्मतारखेचा घोळ पाहता भाजपकडून वाकळे यांना उमेदवारी जाहीर होणार का? याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून उमेदवारी जाहीर न झाल्यास वाकळे काय करणार ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. भाजप अधिकृतपणे गुरुवारी (दि.२७) सकाळी निर्णय जाहीर करणार आहे, असे शहर भाजपच्या सूत्रांनी सांगितले.राष्ट्रवादीचा आज निर्णय, काँग्रेस तटस्थ?राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी मुंबईत बैठक होती. ती बैठक ऐनवेळी रद्द झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीबाबत नक्की काय करायचे, याचा निर्णय बुधवारी होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादीला निवडणूक लढवायची झाल्यास आ. शिवाजी कर्डिले यांच्या कन्या तथा नगरसेविका ज्योती गाडे किंवा नगरसेवक गणेश भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान भाजपला मदत करण्याचा राष्ट्रवादीने घेतलेला एकतर्फी निर्णय काँग्रेस जिव्हारी लागलेला दिसतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणते गणित फायदेशीर ठरेल, याची डॉ. सुजय विखे चाचपणी करीत असून त्यानुसार ते ऐनवेळी निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता आहे.चव्हाण नव्हे; रुपाली वारे!काँग्रेसकडून शीला दीप चव्हाण यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज नेला आहे. मात्र तो दाखल केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार डॉ. सुजय विखे यांनी रुपाली वारे यांना उपमहापौरपदासाठी अर्ज घेण्यास सांगितले होते. मात्र वारे बाहेरगावी असल्याने गैरसोय नको म्हणून चव्हाण यांनी अर्ज घेऊन ठेवला. बाहेरगावाहून आल्यानंतर वारे या गुरुवारी (दि.२७) सकाळी अर्ज दाखल करणार आहेत. या मागे विखे यांची नेमकी कोणती खेळी? हे शुक्रवारीच स्पष्ट होईल.
सेना दोन अर्ज दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:02 AM