अहमदनगर: आषाढी एकादशीच्या पंढरपूर यात्रेसाठी यंदा नगर विभागातर्फे २३५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २५ जून ते ३ जुलै या कालावधीत या सर्व बस तारकपूर स्थानकातून सुटणार आहेत. यंदा २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची सोय म्हणून दरवर्षी एसटी महामंडळातर्फे जादा गाड्यांचे नियोजन केले जाते. यंदाही अहमदनगर विभागाच्या वतीने २३५ जादा गाड्यांचे नियोजन झालेले आहे.
पंढरपूर यात्रेमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधींचे आर्थिक उत्पन्न मिळत असते. परंतु, मध्यंतरी कोरोनामुळे दोन वर्षांत पंढरपूरची यात्रा झाली नाही. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधींचे उत्पन्न बुडाले. मागील वर्षीही नगर विभागातून ३०० जादा बस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या होत्या. नगर शहरातील तारकपूर बसस्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी विशेष बससेवा उपलब्ध असेल. २५ जून ते ४ जुलैपर्यंत जादा गाड्या तारकपूरहून पंढरपूरकडे रवाना होतील. पंढरपूर येथे विठ्ठल कारखाना यात्रा केंद्रावर तात्पुरत्या स्थानकाची व्यवस्था केली असून तेथून परतीच्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ७५ पेक्षा जास्त वयाच्या भक्तांना मोफत प्रवासशासनाने ७५ पेक्षा जास्त वयाच्या भक्तांना मोफत प्रवासाची सोय केली आहे. हीच सोय पंढरपूर यात्रेसाठीही असल्यामुळे या भाविकांना मोफत पांडुरंगाचे दर्शन घेता येणार आहे. याशिवाय महिलांना तिकिटात ५० टक्के सूट असेल. ... तर थेट गावातही येईल बसजिल्ह्यातील ग्रामीण भागातून ४५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पंढरपूरला जाण्यास इच्छुक असल्यास थेट गावातून स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येईल. या स्वतंत्र बसकरिता नजीकच्या आगारास संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन एसटीतर्फे करण्यात आले आहे.