जामखेड : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयास लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १० हजार सिरिंजची मदत पुरविण्यात आली. कोरोना लसीकरणासाठी कमतरता भासणाऱ्या सिरिंजचा वेळेत पुरवठा झाल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहा हजार सिरिंज जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांच्याकडे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुकर राळेभात, पंचायत समिती सभापती राजश्री मोरे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या. प्रभारी तहसीलदार मनोज भोसेकर म्हणाले, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लस घ्यावी, यासाठी पदाधिकारी- कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन नागरिकांना लस घ्यायला प्रेरित करावे. त्यामुळे लसीकरण मोहीम यशस्वी होईल.
नुकताच पदभार घेतलेले गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले, लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावर आम्ही प्रयत्नशील असून, सुशिक्षित लोकांनी पुढाकार घेऊन लसीबाबतच्या गैरसमजुती दूर करून लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, प्रभारी तहसीलदार भोसेकर, गटविकास अधिकारी पोळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोराडे, राष्ट्रवादी पक्षाचे अमोल गिरमे, राजेंद्र गोरे, अशोक धेंडे, उमर कुरेशी, वसीम सय्यद, वैजीनाथ पोले, प्रशांत राळेभात, हरिभाऊ आजबे, महेंद्र राळेभात, अमित जाधव, दिगंबर चव्हाण, गणेश डोके, बिलाल शेख, आदी उपस्थित होते.
.................
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, लस आहे पण सिरिंज नाही, हे ‘लोकमत’मधील वृत्त वाचून आम्ही आमदार रोहित पवार व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दहा हजार सिरिंज दोन्ही तालुक्यांत उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे लसीकरणाला वेग येईल; तसेच आमदार पवार यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या 'लसीकरण आपल्या दारी' मोहिमेतून आणखी मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणार असल्याचे राळेभात यांनी सांगितले.
140921\img_20210914_104912.jpg
( फोटो - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहा हजार सिरींज ग्रामीण रुग्णालयाला भेट देण्यात आल्या)