कोपरगाव : येथील समता नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून शहरातील तसेच तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, दिव्यांग व्यक्तींची कोणत्याही बँकेत असलेली रक्कम रोख स्वरूपात घरपोहोच विनामोबदला देण्याचा सामाजिक उपक्रम राबवून दिलासा देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी समता पतसंस्थेशी संपर्क साधल्यास काही वेळात तुमच्या घरी पैसे पोहोच होतील. त्यामुळे निव्वळ पेन्शन काढण्यासाठी बँकेत जात रांगा लावून कोरोना महामारीत जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले आहे.
कोयटे म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच दुसऱ्या लाटेतील विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीयकृत बँकेत पैसे काढण्यास गेल्यावर तासनतास रांगेत उभे राहून सन्मानपूर्वक हक्काचे पैसे मिळतील याचीही खात्री नाही. अशा नागरिकांची हेळसांड टाळण्यासाठी घरपोहोच मोफत पैसे देण्यासाठी समता पतसंस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अशा नागरिकांनी पतसंस्थेच्या कार्यालयात संपर्क साधून एकदाच नाव नोंदवावे. जेणेकरून या उपक्रमातून नागरिकांना कोणत्याही बँकेत असलेले पैसे काढावयाचे असल्यास ते पतसंस्थेशी संपर्क साधू शकतात. त्यानंतर पतसंस्थेचे कर्मचारी काही वेळातच मायक्रो एटीएम मशीन व रोख रक्कम घेऊन थेट त्यांच्या घरी जाऊन पेन्शनधारक व जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्याकडील कोणत्याही बँकेच्या एटीएमचा पिन टाकून त्यांना हवी असलेली रक्कम मशिनच्या माध्यमातून जागेवरच रोख स्वरूपात देण्यात येईल. विशेष म्हणजे हा उपक्रम पतसंस्थेच्या कोपरगाव येथील मुख्य शाखेसह सर्वच १३ शाखेत गेल्या वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे या जीवघेण्या संकटकाळात जास्तीतजास्त ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोयटे यांनी केले आहे.