जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाली. सुपारी देऊन बोठे याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी अटक करण्याआधीच बोठे नगर शहरातून पसार झाला. गेल्या ३८ दिवसांपासून त्याचा शोध सुरू आहे. आतापर्यंत नगर पोलिसांनी अर्धा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शातीर बोठे मात्र पोलिसांच्या हाताला लागेना. शेवटी पोलिसांनी बोठे याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्याविरोधात नुकतेच पारनेर न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढले आहे. दरम्यान बोठे याने ३१ डिसेंबर रोजी औरंगाबाद खंडपीठात वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. तसेच त्याने पारनेर न्यायालयातही स्टँडिंग वॉरंट काढू नये, यासाठी वकिलामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. तो फरार असून स्वत:च्या बचावासाठी यंत्रणा हलवीत आहे. आता नगर पोलिसांनी राज्यातील ११०० पोलिस ठाण्यांना बोठे याने केलेल्या गुन्ह्याची माहिती पाठवून त्याला अटक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. राज्यभरतील पोलिसांचे बोठे याच्यावर आता लक्ष्य आहे.
दिसेल तेथे फरार बोठे याला अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 4:50 AM