अहमदनगर : लाडक्या श्री गणेशाचे आज उत्साहात आगमन झाले. नगर शहरात बाप्पांच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते. नगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिरात आज (२२ आॅगस्ट) सकाळी मानाच्या गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते विधीवत पूजा, अर्चा करुन श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सोहळा पार पडला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, पंडिरतराव खरपुडे, अशोक कानडे यांच्यासह पदाधिकारी, भाविक उपस्थित होते. यंदा नगरमधील गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल गणेश मंदिरात यंदा भाविकांंना प्रत्यक्ष दर्शन मिळणार नाही. परंतु दहा दिवस मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम, आरती सोशल मीडियातून थेट पाहता येईल, असे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी असे आवाहन यावेळी पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग यांनी केले.
दरम्यान, आज घरोघरी गणेशाच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण होते. गणेश मूर्तीचे घरोघरी पूजनाचे कार्यक्रम सुरू होते. बालगोपालांसह सर्वांचा उत्साह होता.