श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनास बुधवारी अखेर मुहूर्त निघाला. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार बुधवारी १० मे पासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून येडगाव धरणातून ५०० क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. कुकडी धरणात सुमारे साडे सहा टी. एम. सी. २२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामधून हे आवर्तन सोडण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात पाणी सोडल्याशिवाय पर्याय नाही. तरच येडगावचे ४० दिवसांचे आवर्तन पूर्ण होणार आहे.आवर्तन टेलकडे नेताना श्रीगोंद्यातील डी वाय चारी ते चारी क्रमांक १० ते १४ ला अगोदर पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? असा प्रश्न शेतक-यांमधून विचारला जात आहे.