राजूर/भंडारदरा : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार दिवसानंतर पावसाचे कमबॅक झाले. गुरुवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणात मंदावलेली नवीन पाण्याची आवक पुन्हा सुरू झाली.
शुक्रवारी सकाळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ४५ टक्के झाला. निळवंडे धरणातील पाणीसाठा ५२ टक्के झाला. असे असले तरी हा परिसर अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे.
सोमवारपासून भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस एकदम कमी झाल्याने या परिसरातील शेतकºयांचे डोळे नुसत्याच भरून येणाºया आभाळाकडे लागले आहेत. भात रोपे आणि जिरायती शेतातील पिके सुकू लागली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने या सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे.
मागील चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात अचानक पाऊस थांबल्याने तिन्ही धरणांमध्ये होणारी नवीन पाण्याची आवकही एकदम मंदावली होती. भंडारदरा धरणात शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत ४२ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ५ हजार ४ दशलक्ष घनफूट इतका झाला होता.