बोटा : वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर पुणे येथून पायी काढलेल्या आदिवासी शिक्षण संघर्ष मोर्चाचे पुणे-नाशिक महामार्गाने बोटा येथे रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले आहे.आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन न पुरवता डीबीटीप्रमाणे रुपये त्यांचे खात्यात वर्ग केले जाणार आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांचा भोजनाचा प्रश्नच निर्माण होणार आहे. खात्यात रुपये जमा करण्याऐवजी असलेल्या वसतिगृहांमध्येच भोजनाची व्यवस्था करावी या मागणीसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्ताल्यावर पुणे-नाशिक पायी मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय आदिवासी मुलामुलींनी घेतला. पुणे येथून नाशिकच्या दिशेने महामार्गाने सुरु झालेला हा पायी विद्यार्थ्यांचा आदिवासी विद्यार्थी शिक्षण संघर्ष मोर्चा मजल दरमजल करीत रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यात पोहोचला आहे.मोर्चात मदन पथवे, भरत तळपाडे, विजय बहिरट, गजानन डवरे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे व शिंदे येथील मुक्कामानंतर बुधवारी जुलै रोजी मोर्चा नाशिक येथे पोहोचणार आहे.