लोकमत बाल विकास मंच व रचना कला महाविद्यालयाचे आयोजन अहमदनगर: ‘अंतरंग’ समर कॅम्पचा समारोप सोमवारी दादा चौधरी विद्यालय, अहमदनगर येथे झाला. दहा दिवस बालकांनी विविध कला आत्मसात करून शिबिराचा आनंद लुटला. या कार्यक्रमात पालकांचे प्रतिनिधी म्हणून प्रीती डागा, सविता चव्हाण व योगेश देशमुख उपस्थित होते. या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत रचना कला महाविद्यालयाच्या व्यवस्थापिका वर्षा शेकटकर यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक उपस्थित होते. याप्रसंगी सविता चव्हाण व योगेश देशमुख यांनी पालकांच्या वतीने आपले विचार व्यक्त केले. तर डागा यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कला शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार्या सर्व कलाकारांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रचना कला महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर यांनी केले. मुलांच्या मनातील कुतूहल जागृत करून त्यांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी उन्हाळ्याच्या सुटीत खास मुलासाठी अनोख्या कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. नगरमधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून आनंद, अनुभव मिळाला व मुलांची जिज्ञासा वाढीस लागावी यासाठी कार्यशाळेत मातकाम, फ्लॉवर मेकिंग, निगर्सचित्र, पालकासाठी मार्गदर्शन, स्मरणचित्र, स्थिरचित्र, व्यक्तीचित्रण, खडूशिल्प, कागदकाम आदी प्रात्यक्षिके घेण्यात आली. टीव्ही, कार्टुन, व्हिडीओ गेम या सर्व वस्तुंना बाजूला सारून मुलांनी १० दिवस कला शिबिराचा आनंद लुटला. मुलांनी आपल्या अफाट कल्पनांना चालना देऊन दररोज नवनवीन वस्तू प्रत्यक्ष बनवल्या. या अंतरंग समर कॅम्पमध्ये विकास कांबळे, अविनाश सोनवणे, दीपाली देऊतकर, प्रकाश बोरूडे (पुणे), डॉ. सुचित तांबोळी, प्रा. जावेद शेख, स्वप्निल मालवंडे, सचिन घोडे, सुदेश छाजलाने, रोहिणी लखापती हे तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले होते. यापुढे रचना कला महाविद्यालयामध्ये प्रत्येक शनिवारी व रविवारी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला मार्गदर्शन वर्ग शाळेत सुरू करण्यात येणार असून येत्या दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाशकंदील व ग्रेटींग कार्ड बनविण्याचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
‘अंतरंग’ समर कॅम्पमधून बहरली कला
By admin | Published: May 14, 2014 11:30 PM