अहमदनगर - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव (वय ६०) भांगरे यांचे गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले.
भांगरे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या वृत्तास दुजोरा दिला. ही बातमी अकोले तालुक्यात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भांगरे यांनी संघर्षातून आपले राजकारण उभे केले होते. ते कृषी पदवीधर होते. पाच विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यात त्यांनी निकराची लढत दिली. त्यांना मोठा जनाधारही होता. संयमी व सर्वांशी सलोख्याने वागणे हा त्यांचा स्वभाव होता. अकोले पंचायत समितीचे सभापती, समाजकल्याण समितीचे सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, दोन विवाहित मुली, मुलगा जिल्हा बँकेचे संचालक अमित, बंधू दिलीप असा मोठा परिवार आहे. भांगरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होतील, असे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आमदार हे अहमदाबादला दौऱ्यावर निघाले होते. मात्र, त्यांना हे वृत्त समजताच ते अकोल्यात परतले. अकोले व जिल्ह्यासाठीही ही अत्यंत दु:खद बातमी असून एक लढवय्या नेता आपण गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.