शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला नव्हे, तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. येथील गिरमे चौकात मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते.
यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब खेवरे, संजय छल्लारे, सचिन बडधे, लखन भगत, निखिल पवार, अशोक थोरे यावेळी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, नांदेडमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी भाजपच्या दारात जाणे पसंत केले. आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला होता. चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्या प्रवेशावर उत्तर देता आलेले नाही. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशानंतर निवांत झोप लागते, असे उद्गार काढले होते. त्यामुळे ‘ईडी’, ‘सीबीआय’पासून झोप घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे.
भाजपच्या नेत्यांमध्ये कोणतेही कर्तृत्व नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना फोडावे लागत आहे. ‘भारतरत्न’ देऊन नेत्यांना फोडण्याचे काम भाजप करीत आहे, असे ठाकरे म्हणले.