अशोक विखे यांची शरद पवारांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 07:10 PM2019-02-25T19:10:34+5:302019-02-25T19:22:35+5:30
काँग्रेसचे दिवंगत माजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
अहमदनगर : काँग्रेसचे दिवंगत माजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेकांची नावे चर्चेत येत आहेत. या पार्श्वभूमिवर विखे-पवार यांच्यातील या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी देखील या दोघांची भेट होऊन चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. ही जागा राष्ट्रवादीने सुजय यांच्यासाठी सोडावी, यासाठी राधाकृष्ण विखे आग्रही आहेत. ही जागा त्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. तर सुजय यांनी कोणत्याही परिस्थितीत अहमदनगरमधूनच लढण्याचा चंग बांधला आहे. सुजय यांची उमेदवारी निश्चित असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. पक्षाकडून विविध नावे चर्चेत येत असतानाच अशोक विखे यांनी पवारांची भेट घेतल्याने या भेटीस महत्त्व प्राप्त झाले आहे. पवारांनी विखे यांच्याकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींची माहिती घेतली. पण याशिवाय अधिक तपशील सांगण्यास विखे यांनी नकार दिला.