शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील खेळाडूसाठी सुरू करण्यात आलेल्या खेलो इंडीया उपक्रमाचे यश आशियाई स्पर्धेत दिसून आले आहे. अस्लम इनामदारसारख्या असंख्य खेळाडूंनी गावाबरोबरच देशाचेही नाव मोठे केले. अस्लमचा पुढील प्रवास अधिक यशस्वी होण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
आशियाई स्पर्धेत कबड्डीमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या भारतीय संघात टाकळीभानचा सुपूत्र अस्लम शेख याने चमकदार कामगिरी केली.त्याचा नागरी सत्कार मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी उशिरा करण्यात आला. कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.शशिकांत गाढे, नानासाहेब पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, नितीन दिनकर, दिपक पटारे, उपसभापती अभिषेक खंडागळे, उपसरपंच कान्हा खंडागळे, इंद्रभान थोरात, सरपंच अर्चना रणनवरे यांच्यासह अस्लम ईनामदार यांचे कुंटुबिय उपस्थित होते. उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी पुढाकार घेतला.
विखे पाटील म्हणाले, अस्लमचे यश गावापुरते सिमित नाही. ते देशाचे यश आहे. या यशाने जिल्ह्याचा नावलौकीक झालाच मात्र कबड्डीच्या खेळात देश अग्रेसर आहे हे सुध्दा या यशाने दाखवून दिले आहे.
देशात आज क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम पंतप्रधान मोदीजीच्या नेतृत्वाखाली होत आहे. खेलो इंडीया उपक्रमामुळे अनेक खेळाडूना संधी मिळाल्या. प्रो कबड्डीच्या माध्यमातून पुढे आलेले कबड्डीपटू जगाच्या पाठीवर इतर देशांच्या पुढे जात असल्याचा अभिमान असून अतिशय सामान्य परिस्थिती असतानाही अस्लमच्या यशाने त्यांचे कुटुंबिय सुध्दा भारावले आहेत.
अस्लम शेख याने सत्काराला उतर देताना गावातील खेळाडूंना देशपातळीवर घेवून जाण्यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले. प्रा.शशिकांत गाढे यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थ क्रीडाप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.