तळेगाव दिघेमार्गेच्या संगमनेर ते कोपरगाव या तळेगाव चौफुली ते समर्थ पेट्रोल पंप दरम्यानच्या डांबरी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने अवघ्या दीड महिन्यात ठिकठिकाणी रस्ता उखडू लागला. अल्पवधीत उखडलेल्या सदर डांबरी रस्ता कामाची चौकशी करावी, अशी मागणी सरपंच बाबासाहेब कांदळकर व उपसरपंच रमेश दिघे यांनी केली होती. शिवाय छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनीही या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. या प्रश्नी लोकमतच्या गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदार खडबडून जागे झाले. गुरुवारी सकाळपासून डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात करण्यात आली. काम अत्यंत निकृष्ट असल्याने सदर डांबरी रस्ता कामाच्या दर्जाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे व छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे यांनी केली आहे.
१० तळेगाव दिघे
उखडलेल्या डांबरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू करण्यात आले.