अहमदनगर: बोल्हेगाव फाटा येथे जून्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी ( दि. १६) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना रोखले. त्यामुळे तरुण बचावला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाम कदम ( पूर्ण नाव माहित नाही, वय २७ वर्षे, रा. बोल्हेगाव ) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी संतोष धोत्रे (रा. नागापूर चर्चजवळ, एमआयडीसी) याच्यासह एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचे व कदम यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. त्यातूनच धोत्रे याने कदम यांच्यावर हल्ला केला.
याबाबत अधिक माहिती, अशी शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कदम व धोत्रे हे दोघे समोरासमोर आले. त्यांच्यात वाद होऊन धोत्रे याने धारदार शस्त्राने कदम यांच्यावर हल्ला केला. तसेच त्याने पिस्तुलही रोखला होता. याचवेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक चाहेर हे तेथून जात होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी धावत जावून हल्लेखोरांना रोखले. तसेच धोत्रे याला ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले, अशी माहिती पोलिस उपनिरिक्षक चाहेर यांनी दिली.
श्याम कदम यांचे बोल्हेगाव परिसरात हॉटेल आहे. या हॉटेलवरच धोत्रे व कदम यांचे ११ नोंव्हेंबर रोजी भांडण झाले होते. याबाबत शाम कदम यांचा अमोल कदम यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून संतोष धोत्रे याच्यासह पाच जणांविरोात भादवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. तेंव्हापासून धोत्रे हा फरार होता.