Ahilyanagar Election ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे बारा दिवस उरले आहेत. घरोघरी जाऊन गाठीभेटी घेणे आता शक्य नाही. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी प्रचार फेऱ्यांचा धडाका लावला आहे. दिवसभर प्रचार फेऱ्या आणि रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सूचना केल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयार सुरू होती. उमेदवारी माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराचा श्रीगणेशा झाला आहे. उमेदवारांसह त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यांची यंत्रणाही कामाला लागली आहे.
प्रचाराच्या साहित्यापासून ते कार्यकर्ते जमविण्यापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. प्रचाराचे नियोजन करून उमेदवार भल्या सकाळीच घराबाहेर पडतात. दुपारी बारा वाजेपर्यंत प्रचार फेऱ्या सुरू असतात. प्रचार फेरीत संवाद यात्रा, विकास यात्रा, परिवर्तन यात्रा, यासारखे फलक हाती घेतलेले कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांचे, तर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो दिसतात. उमेदवार एका पक्षाचा असला तरी त्यांना इतर चार ते पाच घटक पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे उमेदवारांच्या गळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे पंचे असतात. मित्रपक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे पंचे घालून प्रचारात सहभागी होतात. शहरी भागात सकाळी व संध्याकाळी, अशा दोन टप्प्यात प्रचार फेऱ्या निघतात.
रात्री उशिरापर्यंत प्रचार फेऱ्या सुरू राहतात. उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत होते. महिलांकडून औक्षण करण्यात येते. वेळेअभावी उमेदवारांच्या प्रत्येकाच्या घरी जाणे शक्य नाही. परंतु, कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने उमेदवारांचाही नाईलाज होतो. त्यात बराच वेळ जातो. परिणामी, दिवसभराचे नियोजन कोलमडते. सकाळी सुरू झालेली प्रचारफेरी दुपारपर्यंत सुरू असते. घरातील प्रमुख व्यक्ती कामानिमित्त सकाळीच बाहेर पडतात. त्यामुळे मतदारांची भेट होत नाही. परिणामी, प्रचार फेऱ्या थांबविण्याची वेळ उमेदवारांवर येते. फेऱ्यांबरोबरच इतरही नियोजन करावे लागते. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठका शक्यतो रात्री होतात.