अहमदनगर: केडगाव तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह पंधरा जण शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. यामध्ये माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र नगरसेवक विक्रम राठोड यांचाही समावेश आहे. केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने घटनास्थळी तोडफोड केली होती. याप्रकरणी सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह इतर ६०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या आधी पोलीसांनी सतरा शिवसैनिकांना अटक केली होती़ त्यांना जामीन मिळाला आहे. शुक्रवारी दिलीप सातपुते, विक्रम राठोड यांच्यासह दीपक खैरे, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतनी, सुनील सातपुते, देविदास मोढवे, मुकेश जोशी, विजय पठारे, संतोष फसले, चेमन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा हे कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले. तोडफोड प्रकरणी अनिल राठोड मात्र पोलीसांत अद्याप हजर झाले नसून पोलिसांनी त्यांना अटकही केलेली नाही.
केडगाव तोडफोडप्रकरणी पंधरा शिवसैनिक पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 11:56 AM