- प्रकाश महाले
राजूर (अहमदनगर): भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहाकार. घाटघर, रतनवाडी, पांजरे येथे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. भंडारदरा धरणातून २७ हजार तर निळवंडे धरणातून ७ हजार कयुसेक् ने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
शनिवारी दिवस रात्र मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्राला धुव्वाधार पावसाने झोडपून काढले. या चोवीस तासांत घाटघर येथे तब्बल १९ इंच म्हणजेच ४७५ मिमी पाऊस कोसळला तर रतनवाडी येथे ४४९ आणि पांजरे येथे ४४५ मिमी तर भंडारदरा येथे २४५ मिमी पाऊस पडला. या अती अती मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प झाले आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले असून शेती पाण्याखाली गेली आहे. शेत जमिनींचे बांध फुटले आहे.
या धुमाकूळ घातलेल्या पावसामुळे भंडारदरा धरणात २४ तासांत १ हजार २७३ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली, यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणावर म्हणजेच २७ हजार ११४ क्युसेक ने पाणी सोडण्यात आले. या पूर्वी १९ सप्टेंबर २००८ मध्ये धरणातून ३० हजार ९१८ कयुसेक् ने पाणी सोडण्यात आले होते. या नंतर प्रथमच धरणातून पाणी सोडण्यात आले. वाकी येथील कृष्णावंती नदीवर बांधण्यात आलेल्या लघु पाटबंधारे तालावावरून ४ हजार ४७ कयुसेक् ने विसर्ग सुरू आहे.
या मोठ्या प्रमाणावरील पाण्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आणि या धरणातूनही या वर्षी प्रथमच ७ हजार ३२० कयुसेक् ने पाणी प्रवरा नदीच्या पात्रात सोडण्यास सुरूवात झाली. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातही पावसाने कहर केला असल्यामुळे मुळा नदीलाही आता पूर आला आहे सकाळी सहा वाजता लईच जवळील मुळा नदीचा विसर्ग 23 हजार 765 क्युसेक् इतका होता.