सुपा : पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वरदान असलेला व गावाची तहान भगवणारा पाझर तलाव क्रमांक एक या वर्षी ऐन पावसाळ्यात आटला आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. पुढील काळात पाऊस न झाल्यास यंदा गोरेगावकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
१९७२ सालच्या भीषण दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून या तलावाची निर्मिती झाली. अनेकांच्या विरोधाला न जुमानता तत्कालीन अधिकारी व राजकारणी मंडळींनी या तलावाचे काम सुरू केल्याने दुष्काळात लोकांना काम मिळाले तर सुकडीच्या माध्यमातून खाण्यासाठी त्यावेळच्या मजुरांना आधार प्राप्त झाला होता. तलावाचे काम झाल्यावर पहिल्यांदाच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यावर त्या खालच्या विहिरींची पाणी पातळी वाढली. अनेक शेतकऱ्यांनी नदीकाठी विहिरी घेतल्या व पाईप लाईनद्वारे शेती ओलिताखाली आणल्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. आता मात्र या तलावात माती साठल्याने तलावाची साठवण क्षमता कमी झाल्याचे शेतकरी सांगतात. गत वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळातच तलावात पाण्याचा मुबलक साठा झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. परंतु यावर्षी सप्टेंबर संपत आला तरी तलावात पाणी न साठल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गोरेगावसाठी काळू प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आणण्यात आले असले तरी गावातील तलावाखाली असणाऱ्या विहिरीतून गावाला मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने गावाला पाण्यासाठी मोठा आधार देणारी ही योजना आहे. त्यामुळे गावकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. तलावाची पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी त्यातील माती काढणे गरजेचे असून या पोयट्याने जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होत असल्याने तो काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन व मदत व परवानगी देण्याची गरज आहे.
................
फोटो ----पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांना वरदान असणारा पाझर तलाव क्रमांक एक ऐन पावसाळ्यात आटला आहे.
210921\1512-img-20210921-wa0014.jpg
सुपा बातमी