अहमदनगर : नगर शहरातील माळीवाडा परिसरात मारुती कुरिअर फर्ममध्ये मंगळवारी रात्री झालेल्या क्रूड बॉम्बस्फोटाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस प्रशासनाला आज सायंकाळी याबाबत आदेश प्राप्त झाले. या स्फोटामागे दहशतवादी कारवाईचा संशय असल्याने मंगळवारी रात्रीपासूनच दहशतवादविरोधी पथक या घटनेचा तपास करत आहे. गुन्ह्याची पद्धत व टार्गेटवरील व्यक्ती यावरून या घटनेची व्याप्ती मोठी दिसून येते. घटनेत दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहशतवादी कारवाईची शक्यता गृहीत धरून गृह खात्याने या गुन्ह्याचा तपास ‘एटीएस’च्या नाशिक युनिटकडे वर्ग केला आहे.नाशिक युनिटचे पोलिस निरीक्षक एन.एम. वाघमोडे हे गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. एटीएसचे पोलिस अधीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिका-यांचे पथक बुधवारी सकाळपासूनच नगरमध्ये ठाण मांडून आहे. गुरुवारी दुपारी त्यांची शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडली. दोन दिवसांपासून नगर जिल्हा पोलिसांची काही विशेष पथके या गुन्ह्याच्या तपासात व्यस्त होती. मात्र या घटनेतील आरोपींबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे तपासणीच्या यंत्रणेच्या हाती लागलेले नाहीत.