अहमदनगर: नगरकरांचे आराध्य दैवत असलेल्या विशाल गणपती मंदिर परिसराची शुक्रवारी एटीएस व श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली़ तपासणी दरम्यान पथकाने कायदा व सुव्यवस्थेबाबत मंदिराच्या विश्वस्तांना सूचना केल्या असून, गणेशोत्सव काळात विशेष काळजी घेण्याबाबत कळविण्यात आले़गणेशोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला आहे़ गणेश भक्त माळीवाडा येथील विशाल गणपतीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात़ गणेशोत्सवात विशाल गणपती मंदिरात कायमच भक्तांची गर्दी असते़ या पार्श्वभूमीवर एटीएस व श्वान पथकाकडून विशाल गणपती मंदिर व परिसराची तपासणी करण्यात आली़ यावेळी विश्वस्तांना पथकाकडून माहिती देण्यात आली़ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही,यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे़ खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी करण्यात आली आहे़नगर शहरात गणेशोत्सवात मोठी गर्दी होते़ गणेश मंडळांकडून सादर केली जाणारी आरास पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून नागरिक येतात़ रस्त्यावरही कायमच गर्दी होते़ त्यामुळे शहरात विविध चौक व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरातील काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे़ तसेच शहरासह जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी लागू करण्यात आली आहे़ पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेबाबत वेळोवेळी आढावा घेतला जात असून, विशाल गणपती मंदिराची तपासणी करून आढावा घेण्यात आल्याचे समजते़ (प्रतिनिधी)जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या हस्ते माळीवाडा येथील ग्रामदैवत असलेल्या विशाल गणेश मंदिरात ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना करण्यात आली़
‘विशाल गणेश’ परिसराची एटीएसकडून तपासणी
By admin | Published: August 29, 2014 11:37 PM