श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील पत्रकार शिवाजी साळुंके हे सोमवारी सकाळी औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर भगदाडाचे फोटो व वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी येथे जमावबंदीचा आदेश मोडून ५ ते ६ जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पत्रकार शिवाजी सांळुके यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी स्वत: लक्ष घातले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने औटीवाडीत जाऊन मंगळवारी भल्या पहाटे तीन जणांना अटक केली आहे. दोन आरोपी मोबाईल बंद करून फरार झाले आहेत. याप्रकरणी आबा सखाराम औटी, दशरथ आण्णा औटी, ज्ञानदेव औटी, भरत औटी, आबा औटी (रा.श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी श्रीगोंद्यातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची भेट घेऊन आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. त्यावर पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी स्वत: कडे तपास घेऊन तीन आरोपी गजाआड केले.
श्रीगोंद्यात पत्रकारावर हल्ला; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:55 AM